ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा), 10 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील आदिवासी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला बाहेरगावाहून आदिवासी समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गावातून आदिवासी समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आदिवासी महिला, युवक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी समाजातील आयोजक सागर तडवी, अन्सार तडवी, शाहरुख तडवी, रुतिक तडवी आणि शकील तडवी यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच शालेय समितीचे अध्यक्ष गोकुळ परदेशी, पोलीस पाटील दत्तू पाटील, ग्रामपंचायत सदस्या शकीलाबाई तडवी, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासन, आयोजक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.
हेही वाचा: “काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे






