पाचोरा, 1 ऑक्टोबर: सेवा संकल्प अभियान व ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना विविध शासकीय योजना व प्रमाणपत्रांचा लाभ देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माळी समाज मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात एकूण २२२ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.
पुरवठा विभागामार्फत १३ नवीन रेशन कार्ड, २ नाव कमी करणे, ३७ नवीन नावे समाविष्ट करणे तसेच ४ लाभार्थ्यांना धान्याचा लाभ देण्यात आला. संगायो शाखेमार्फत ३ अर्ज मंजूर करण्यात आले, तर १७ लाभार्थ्यांना डीएलसीचा लाभ देण्यात आला.
महसूल विभागामार्फत ३८ उत्पन्न दाखले, १२ जातीचे दाखले तसेच ५ लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनुलोम संस्थेमार्फत २ नवीन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. महिला व बाल विकास विभागामार्फत ४ महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यात आला.
आरोग्य विभागामार्फत ३७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ९ गरोदर मातांची नोंदणी करण्यात आली, तर १२ आभा कार्ड आणि २७ आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास संजय गांधी नायब तहसीलदार प्रतिभा राजपूत, ग्राम विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी पिंपळगाव बुद्रुक तसेच भटक्या व विमुक्त समाज संघटनेचे अशासकीय सदस्य विकास लोहार, प्रकाश गोसावी, योगेश हटकर, अनुलोम संस्थेचे सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे व सेवांचा लाभ त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि सेवा वितरण अधिक गतिमान व्हावे, यासाठी अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाचोरा प्रांत तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.






