जळगाव, 15 जानेवारी : जळगावातील तीन नगरसेवकांनी उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा काढून शिंदे गटात प्रवेश केला आहे. जळगाव पालकमंत्री आणि शिंदे गटातील वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तीन नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटीलही उपस्थित होते.
भाजप नगरसेवक किशोर बाविस्कर, मनोज अहुजा आणि रेखाबाई सोनवणे यांनी पक्षाला सोडून शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, काल त्यांनी पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान, यावेळी नगरसेविका रेखाबाई सोनवणे उपस्थित नव्हत्या. मात्र, त्यांचा मुलगा उमेश सोनवणे उपस्थित होते.
या वेळी त्यांच्या समवेत महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत यांच्यासह गजानन देशमुख, कुंदन काळे, पन्नालाल मावळे, उमेश सोनावणे उपस्थित होते.
प्रभागांमध्ये विकासकामे होत नाहीत, असे कारण देत भाजप नगरसेवकांनी बंडखोरी करीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, यानंतर आता पुन्हा बंडखोर नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महापौर आणि उपमहापौर हे काम करत नसल्याच्या कारणावरुन शनिवारी भाजपचे बंडखोर नगरसेवक मनोज आहुजा, किशोर बाविस्कर, रेखाबाई सोनवणे यांचा मुलगा उमेश सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान, आणखी काही नाराज असलेले नगरसेवक शिंदे गटात प्रवेशासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – कार्यकर्त्याचा फोन आणि आमदार पुत्राने काढली गाडी, पाचोऱ्यात नेमकं काय घडलं?
नगरसेवकांनी शिंदे गटात जाण्याचे निर्णय का घेतला?
गेल्या 22 महिन्यांपासून परिवर्तन व्हावे, यासाठी शिवसेनेसोबत होतो. यातून प्रभागाचा विकास आणि विकासाच्या माध्यमातून जनतेचे कल्याण, हेच एक ध्येय होते. मात्र, महापौर, उपमहापौर यांना अनेकदा आमच्या प्रभागांनाही निधी देण्यासंदर्भात सांगितले. पण त्यांच्याकडू फक्त होकार मिळायचा. तर दुसरीकडे आलेल्या प्रत्येक निधीतून दोघांच्या प्रभागातील कामे होत होती. उपमहापौरांनी तर दोन ते अडीच कोटींची कामे मनपा फंडातून केली.
तसेच आम्हीही पर्यावरण विभागाच्या वृक्षारोपण समितीच्या कामांसाठी आलेल्या अडीच कोटींच्या निधीतून 40 ते 50 लाखांची कामे करून द्या, सांगितले. त्यावर त्यांनी दुसऱ्याच नगरसेवकांची कामे यात समाविष्ट केल्याची माहिती मिळाली. यामुळे आम्ही शिंदे गटात प्रवेश करत आहोत, असे या नगरसेवकांनी सांगितले.