मुंबई – राज्यमंत्री मंडळाचा विस्तार मागच्या महिन्यात 15 डिसेंबरला नागपूर येथे झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री जाहीर न झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये खान्देशातील मंत्र्यांना नेमके कोणते जिल्हे मिळाले हे जाणून घेऊयात.
मागच्या महिन्यात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात खान्देशातून 4 जणांना संधी देण्यात आली होती. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील, जामनेरचे आमदार गिरीश महाजन, भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद कधी जाहीर होणार, कोणत्या मंत्र्याला कोणता जिल्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच जळगाव जिल्ह्यातील एकूण 3 जणांना कॅबिनेट मंत्रिपद दिल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याचीही सर्वांना उत्सुकता होती. अखेर आज राज्यातील पालकमंत्रीपद जाहीर झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्विकारले आहे.
खान्देशातील मंत्र्यांना कोणता जिल्हा मिळाला –
- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
- जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास) मंत्री आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
- वस्त्रोद्योग मंत्री आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
- पणनमंत्री आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडाचे आमदार जयकुमार रावल हे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
हेही वाचा – मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, जळगावात कोणाला मिळाली संधी?, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर