जळगाव, 7 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली. दरम्यान, या मोहिमेत केलेल्या कारवाईमध्ये 10 गावठी कट्ठयांसह 24 जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काल सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली माहिती –
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून दि. 15 सप्टेंबर ते दि. 30 सप्टेंबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलीय.
- पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समाधान बळीराम निकम (रा. पाचोरा) याच्याकडून दोन कट्टे आणि 1 काडतूस जप्त केले. त्याच्याविरूद्ध आठ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
- अमळनेर येथील अनिल मोहन चंडाले (रा. अमळनेर) याच्याकडून 2 कट्टे, चार काडतूस जप्त.
- यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर (रा. यावल) याच्यासह अन्य एका जणाकडून गावठी कट्टा आणि दोन काडतूस जप्त.
- भुसावळ येथील अमर देविसिंग कसोटे (रा. भुसावळ) याच्याकडून 1 कट्टा, २ काडतूस जप्त केले असून त्यांच्याविरुद्ध यापुर्वी प्रत्येक एक गुन्ह्याची नोंद आहे.
- वरणगाव येथील काविन बाबू भोसले (रा. हलखेडा) यांच्याकडून गावठी कट्टा, दोन काडतूस जप्त.
- एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विठ्ठल वामन भोळे (रा. जळगाव, ह.मु. पुणे) याच्याकडून 1 कट्टा 4 काडतूस जप्त केले असून त्याच्याविरुद्ध 3 गुन्हे दाखल आहेत.
- जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल रा. जळगाव याच्यासह 3 जणांना अटक करत 2 गावठी कट्टे व 10 काडतूस जप्त केले असून यापुर्वी युनुस पटेल विरोधात 2 गुन्हे दाखल आहेत.
जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष कामगिरी –
सदरची कार्यवाही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर, जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, तसेच अधिकारी व अंमलदार, नमुद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली आहे.