ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 16 मार्च: पाचोरा-भडगाव मतदारसंघात दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विशेषतः पिंपळगाव हरेश्वर-शिंदाड गट परिसरातील गावांमध्ये शेतीचे नुकसान होण्याबरोबरच अनेक गुरे वाहून गेली होती. तसेच अनेक रस्ते आणि पुलांची दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी तसेच वाहून गेलेल्या गुरांचा मोबदला मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी प्रशासकीय मान्यताही मिळाली असून सध्या संबंधित कामे टेंडर प्रक्रियेत असल्याची माहिती मिळाली आहे.
विशेषतः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिंपळगाव हरेश्वर–जुने जरंडी रस्ता तसेच पिंपळगाव–जरंडी (ग्रामीण मार्ग क्र. 205 आणि ग्रामीण मार्ग क्र. 203) या दोन्ही रस्त्यांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार असून एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या 10 कोटी रुपयांच्या निधीपैकी किमान 8 कोटी रुपयांचा निधी पिंपळगाव हरेश्वर गटातील रस्त्यांवर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या विषयावर काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करतील, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नमूद केले. संबंधित कागदपत्रे पाहून आणि झालेला पाठपुरावा लक्षात घेऊन काहीजण आंदोलन किंवा उपोषणाच्या माध्यमातून या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र विरोधकांनी असा केविलवाणा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले. लवकरच या रस्त्यांची कामे शंभर टक्के पूर्ण होतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पिंपळगाव परिसरातील गोरख तात्या, रवि गीते, पिंपळगावचे सरपंच रवी पाटील, भगवान पाटील, कैलास क्षीरसागर, बी.जी. पाटील, परेश पाटील यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील या रस्त्यांच्या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.






