अहमदाबाद, 1 जून: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात (IPL 2026 Final) गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक सामन्यात आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. गुजरातने दिलेले १५६ धावांचे आव्हान आरसीबीने १८ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले.
अंतिम सामन्यात काय घडलं? –
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा आरसीबीने निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली आणि कर्णधार शुभमन गिल अवघ्या १० धावांवर बाद झाला. यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरातला ठराविक अंतराने धक्के दिले. वॉशिंग्टन सुंदरने ३७ चेंडूंत ५० धावांची एकाकी झुंज दिल्यामुळे गुजरातला २० षटकांत ८ बाद १५५ धावा करता आल्या. यामध्ये आरसीबीकडून रसिक सलामने २७ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक –
१५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला वेंकटेश अय्यर (३२ धावा) आणि विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. मधल्या षटकांत राशीद खानने (२ विकेट्स) दोन धक्के देत गुजरातला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका बाजूने खंबीर उभे राहिलेल्या विराट कोहलीने गुजरातच्या गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. त्याने अवघ्या २५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने ४२ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी खेळली.
दरम्यान, अंतिम सामन्यात आपल्या शानदार नाबाद ७५ धावांच्या खेळीने संघाला विजेतेपद मिळवून देणारा किंग विराट कोहली या सामन्याचा सामनावीर ठरला.
थोडक्यात धावसंख्या (स्कोअरकार्ड):
गुजरात टायटन्स: २० षटकांत १५५/८ (वॉशिंग्टन सुंदर ५०, रसिक सलाम ३/२७, भुवनेश्वर कुमार २/२९)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: १८ षटकांत १६१/५ (विराट कोहली ७५*, वेंकटेश अय्यर ३२, राशीद खान २/२५)
सामनावीर – विराट कोहली
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा): राजस्थान रॉयल्सच्या अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने यंदाच्या ऑरेंज कॅपचा बहुमान पटकावला. त्याने १६ सामन्यांत सर्वाधिक ७७६ धावा करत इतिहास रचला आणि आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण ऑरेंज कॅप विजेता ठरला.
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स): उपविजेत्या गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने पर्पल कॅपवर आपले नाव कोरले. रबाडाने १७ सामन्यांत अप्रतिम गोलंदाजी करत सर्वाधिक २९ बळी घेतले. या शर्यतीत आरसीबीचा भुवनेश्वर कुमार २८ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.






