नवी दिल्ली, 20 जुलै: देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे आज, २० जुलै २०२६ रोजी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि हजारो तरुण विद्यार्थ्यांच्या ‘चलो संसद’ मार्चमुळे तणावाचे वातावरण दिसून आले. नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी, शैक्षणिक गैरव्यवहार आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
नवी दिल्लीत काय घडलं? –
नवी दिल्ली जिल्हा परिसरात प्रशासनाने ‘BNSS चे कलम १६३’ (जमावबंदी) लागू करून या संसद मार्चला परवानगी नाकारली होती. मात्र, आदेश झुगारून सकाळी १० च्या सुमारास १० हजारांहून अधिक आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून संसदेच्या दिशेने कूच केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या जवानांनी आंदोलकांवर जोरदार लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे दिवसभराचे काम स्थगित –
आंदोलक थेट संसदेच्या अगदी जवळ, रायसीना रोड आणि विजय चौकापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून संसद भवनाचे सर्व मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद करण्यात आले. बाहेर सुरू असलेल्या या प्रचंड गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा आणि राज्यसभा) कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.
वाहतूक आणि इंटरनेट सेवेवर निर्बंध –
सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीतील राजीव चौक, जनपथ यांसारखी महत्त्वाची मेट्रो स्थानके बंद करण्यात आली. तसेच जंतरमंतर आणि लुटियन्स दिल्ली परिसरात इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली असून अनेक रस्ते बॅरिकेड्स लावून रोखण्यात आले आहेत.
आंदोलकांना शांतता राखण्याचे केंद्र सरकारचे आवाहन –
सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर, आंदोलनाचे नेतृत्व करणारे CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आधी उपोषण सुरू केले होते. मात्र, सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून त्यांनी उपोषण मागे घेतले आणि आंदोलनात उडी घेतली. तणाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने संवादाची भूमिका घेतली. दरम्यान, CJP च्या शिष्टमंडळाने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. नड्डा यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून जंतरमंतर परिसरात यापुढे कोणतीही बळाची कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
सोनम वांगचूक यांनी काय म्हटलंय? –
सोनम वांगचूक म्हणाले की, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर ज्या निर्घृणपणे कारवाई करण्यात आली, त्या निषेधार्थ मी माझे उपोषण पुढे चालूच ठेवणार आहे. जोपर्यंत आंदोलन करणाऱ्या युवा नेत्यांना संसद भवनात जाऊन लोकप्रतिनिधींना भेटण्याची परवानगी मिळत नाही, किंवा खासदारांना रुग्णालयात येऊन मला भेटू दिले जात नाही, तोपर्यंत माझे उपोषण मागे घेतले जाणार नाही. दरम्यान, या कठीण परिस्थितीतही तरुण आंदोलक उद्याही आपला संयम आणि शांतता ढळू देणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार राहुल गांधी यांनी काय म्हटलंय? –
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या आंदोलनावर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, विद्यमान केंद्र सरकार हे असत्य आणि हिंसेचा मार्ग अवलंबत असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करत राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक तरुण-विरोधी पंतप्रधान ठरले आहेत. दिल्लीत रस्त्यावर उतरलेले तरुण गुन्हेगार नसून ते केवळ स्वतःचे हक्क मागत आहेत. त्यांना पारदर्शक, सक्षम आणि सन्मानाची शिक्षण व्यवस्था मिळणे हा त्यांचा अधिकार आहे; त्यामुळे त्यांचे हे आंदोलन पूर्णपणे योग्य आहे.






