मुंबई, 14 ऑगस्ट: केंद्र शासनाने उपनगरीय लोकलची मेट्रोच्या धर्तीवर निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे बनवित असलेल्या कारखान्यात स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित, स्वच्छ अशा मेट्रोसारख्या लोकल ट्रेनची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई महानगराच्या दळणवळणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून लोकार्पण होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे मुंबईतील दळणवळणाला ‘गतिमानतेचा बूस्टर’ मिळाला असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
View this post on Instagram
सह्याद्री अतिथी गृह येथे दूरदृश्यप्रणालीद्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन पायाभूत सुविधांचे ई-लोकार्पण, ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पातील ठाणे बाजूकडील टीबीएम अर्जुनाचा शुभारंभ आणि वांद्रे कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रुतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपूलाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल नामकरण कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजहंस सिंह, अबू आजमी उपस्थित होते.
२०२७ मध्ये मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरमध्ये एकीकडे स्वच्छ सुंदर व वातानुकूलित मेट्रोचा प्रवास आहे तर दुसरीकडे कष्टप्रद वाटत असणारा लोकलचा प्रवास आहे. यामधील तफावत लवकरच दूर होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन २०२७ मध्ये येणार असून मार्च २०३० पर्यंत संपूर्ण लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील.
हेही वाचा: नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






