जळगाव, 16 ऑगस्ट: सामूहिक वन हक्क योजना आणि विकसित भारत आजीविका रोजगार मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या पाच गावांपैकी रावेर तालुक्यातील निमड्या येथे वृक्षलागवडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिल्या प्रयोगाचा शुभारंभ जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आला.
निमड्या येथील ५ हजार हेक्टरवर सुमारे ३ हजार ७६० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहेत. सीएफआर क्षेत्रातील मजुरांना त्यांच्याच गावात VB G RAM G अंतर्गत रोजगार उपलब्ध होणार असल्याने तेथील मजुरांचे स्थलांतर थांबण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपवनसंरक्षक सौरव सहाय, मिशनच्या उपजिल्हाधिकारी मंजुषा घाटगे, यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार आर डी पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. काळे, लोक संग्राम मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे, निमड्या येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनसंवर्धनातून रोजगाराची नवी दारे –
सामूहिक वन हक्क योजना आणि विकसित भारत आजीविका रोजगार मिशनच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारी योजना आणली आहे. आदिवासी बांधवांचे जीवन जंगल आणि वनोपजाशी घट्ट जोडलेले आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हातात विकासाची नवी दिशा आली आहे.
वन हक्क दाव्यांसंदर्भात सीएफआर आणि आयएफआर कायद्यामुळे गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विविध उपक्रम राबविता येणार आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर वनसंवर्धनास चालना मिळेल. गावकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेत आपल्या गावासोबतच परिसरातील जंगलाचे संवर्धन करावे. गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग लाभला, तर सातपुड्याचे हरवलेले गतवैभव पुन्हा मिळविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जंगल वाचवू, रोजगाराच्या नव्या वाटा निर्माण करू’ –
चांदणी बारेला तसेच वन हक्क समितीचे सदस्य इरफान तडवी व रतन बारेला यांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. जंगल हे आमचे हक्काचे असून त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाने अत्यंत चांगली योजना आणली आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ वृक्षलागवड करण्यासोबतच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपनही करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, वनसंवर्धनाच्या माध्यमातून वर्षभर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.






