जळगाव, 2 ऑक्टोबर: राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची निवेदने स्वीकारणार असून, एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथे दुष्काळग्रस्त भागातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
मंत्री बावनकुळे यांचे शनिवारी रात्री 7 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन होणार आहे. त्यानंतर रविवार 4 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होतील. येथे नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी त्यांच्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
यानंतर सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून मोटारीने पातरखेडे, ता. एरंडोलकडे ते रवाना होतील. दरम्यान, दुपारी १२.१५ वाजता पातरखेडे येथे दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी करणार आहे. तसेच ते दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
महसूल मंत्र्यांकडून राज्यातील विविध भागात पाहणी –
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीवर भर दिला जात आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी अलीकडेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पिकांचे अचूक पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी ते विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.
एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथील पाहणीनंतर दुपारी १ वाजता ते मोटारीने पातरखेडे येथून धुळे जिल्ह्यातील कासाविहीरकडे प्रयाण करणार आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या या दौऱ्याकडे दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागले आहे.






