चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 29 मार्च : लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापत स्मिता वाघ यांनी उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, उन्मेष पाटील तिकीट वाटपावरून नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर भाजपच्या खासदारकीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाल्या स्मिता वाघ? –
भाजपच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीच्या उमेदवार स्मिता वाघ म्हणाल्या की, मागील लोकसभा निवडणुकीत मला देण्यात आलेली संधी मागे घेण्यात आली आणि पक्षाने मला जो आदेश दिला तो मी पाळला. त्यावेळी मी उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी दुसऱ्याच दिवसापासून काम लागले. एवढेच नव्हे तर त्यांची सूचक अनुमोदक म्हणूनही काम पाहिले. म्हणून ते पक्ष सोडून जाणार नाहीत, ते पक्षासाठी काम करतील, असे त्यांनी मला आश्वासित केले असल्याचे स्मिता वाघ म्हणाल्या.
उन्मेष पाटील असा निर्णय घेणार नाहीत –
उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील ह्या ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर स्मिता वाघ म्हणाल्या की, 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य, विधान परिषद आमदार आणि महाराष्ट्र महिला मोर्चाची अध्यक्षा, अशी विविध पदे पक्षाच्यावतीने मी भूषवलेली आहेत. तसेच उन्मेष पाटील यांना देखील विधानसभा तसेच लोकसभेसाठी संधी दिली. आतापर्यंत त्यांना पक्षाने खूप काही दिले आहे. म्हणून संपदाताई आणि उन्मेश पाटील असा काही निर्णय घेणार नाहीत आणि घेतला तर ते लवकरच स्पष्ठ होईल, असे स्मिता वाघ म्हणाल्या.
महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर भाष्य –
भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीतील शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर स्मिता वाघ म्हणाल्या की, जळगाव जिल्ह्यातील महायुतीतील पदाधिकारी कुठेही नाराज नाहीत. सर्वच माझ्या प्रचारासाठी नियोजन करत असून लवकरच आम्ही महायुतीच्या मेळाव्याच आयोजन करणार आहोत. लोकसभा निवडणुकीत विरोधात कुणीही उमेदवार असले तरीही ही निवडणूक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात लढू आणि जिंकूच, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : भाजपचं ठरलं मात्र ठाकरे गटाचं काही ठरेना! स्मिता वाघ यांच्याविरोधात जळगावात कुणाला मिळणार संधी?