सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 12 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील धरणगाव रस्त्यावरील धाबे येथील एका आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबाच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. आग लागल्याच्या या घटनेमुळे लाखोचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी 11 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली.
काय आहे संपूर्ण घटना –
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील धाबे गावातील अनिल हिरामण पवार यांचे घर दूध डेअरीला लागून असलेल्या मंदिराजवळ आहे. रात्री ते जेवण करून दिवा लावून झोपलेले होते. यावेळी मंदिराची वायर झोपड्यावर पडल्याने अचानक आग लागली. आगीची चाहूल लागताच अनिल पवार व त्यांचे कुटुंबीय तत्काळ झोपेतून उठून बाहेर पळाले. यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले 60 हजार रुपये रोख रक्कम जळून खाक झाले.
यासोबतच घरातील संसार उपयोगी वस्तू, कपडे, धान्य, भांडी, आदी जळून खाक झाले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देतात पारोळा नगर पालिकेच्या अग्निशमन बंबचालक मनोज पाटील, जितेंद्र पाटील शेळावे घटनास्थळी हजर झाले. त्यांच्यासह धाबे गावातील तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्र रूप घेतल्याने सर्व घर जळून खाक झाले.
कुंटूबाला मदतीची मागणी –
आगीच्या या घटनेनंतर अनिल पवार यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी अनिल पवार व त्यांच्या कुटुंबाने केली आहे.
हेही वाचा : अमळनेर शहरात वादळी पावसासह गारपीठ, अवकाळीमुळे झाडे उन्मळून पडली