चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नाशिक, 15 मे : एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करत आहोत. विविध कारणे पुढे करत आपण आपले मतदान करत नाहीत. मित्रहो, आपण जर अशी सुस्ती दाखवली तर भविष्यात खूप मोठ्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागेल, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन म्हणाले. ते नाशिक येथील जाहीरसभेत बोलत होते.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन? –
मंत्री गिरीश महाजन उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, ही निवडणूक आपल्या देशासाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी सर्वात महत्वाची आहे. ही निवडणूक जातीपातीची नसून देशाच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. काही समाजातील लोकं कुणी दुबई तर कुणी सिंगापूर किंवा मलेशियातून मतदानासाठी येत आहेत. आणि आपण मात्र, सुस्त आहोत. आपलं मतदान कुठे 50-55 टक्के तर कुठे 60 टक्के मग आपण कधी जागृत होणार आहोत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल –
मंत्री महाजन पुढे म्हणाले की, एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करत आहोत. विविध कारणे पुढे करत आपण आपले मतदान करत नाहीत. मित्रहो, आपण जर अशी सुस्ती दाखवली तर भविष्यात खूप मोठ्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागेल, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. आणि म्हणून महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी 85 ते 90 टक्के याठिकाणी मतदान झालेच पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
“मोदीजींशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही” –
विरोधकांना मोदींजीची त्यांना अॅलर्जी आहे. या देशात पुन्हा आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचे असेल, देशाला महासत्ता बनावयचे असेल, देशाला सुजलाम-सुफलाम करायचे असेल, देशाला सुरक्षित करायचे असेल तर मोदीजींशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही. गेल्या 10 वर्षांपासून मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. आज देश सुपर पॉवर होऊ पाहत आहे. चीन, पाकिस्तान सारख्या देश आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
नाशिकमध्ये जाहीरसभेचे आयोजन –
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीरसभा पार पडली. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री दादा भूसे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर