ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 नोव्हेंबर: दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत मिळण्यास विलंब होत असल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा ‘भिक मांगो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीने दिला होता.
दरम्यान, या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मदत वितरणाची प्रक्रिया सुरू केली असून, तालुक्यातील ४८ हजार ७७२ पात्र शेतकऱ्यांना एकूण २४ कोटी ३८ लाख ६० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी नियोजित आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसने दिला होता आंदोलनाचा इशारा –
शासनाने दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, दिवाळी जवळ येऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर सचिन सोमवंशी यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी तहसीलदारांकडे निवेदन देत तातडीने मदत वितरित करण्याची मागणी केली. अन्यथा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘भिक मांगो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.
४८ हजार ७७२ शेतकऱ्यांसाठी २४ कोटींची मदत –
काँग्रेसच्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार विजय शिवाजी बनसोडे यांनी ३ नोव्हेंबर रोजी लेखी पत्राद्वारे मदत वितरणाबाबत माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या २८ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पाचोरा तालुक्यातील ४८ हजार ७७२ पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण २४ कोटी ३८ लाख ६० हजार रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे.
खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने आंदोलन स्थगित –
प्रशासनाकडून लेखी पत्र मिळाल्यानंतर आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने काँग्रेसने तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सचिन सोमवंशी यांनी सांगितले. मात्र, सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या छोट्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाची मागणीही काँग्रेसने कायम ठेवली आहे. संबंधित व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.






