चोपडा, 23 सप्टेंबर: चोपडा शहरातील श्री गणेशोत्सवाची मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी चोपडा शहर पोलिसांनी केलेल्या नियोजनबद्ध बंदोबस्ताबद्दल पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा चोपडा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेत नियोजनबद्ध बंदोबस्त तैनात केला होता. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे मुस्लिम समाजातील मान्यवरांनी यावेळी कौतुक केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा गणेश मंडळाच्या मिरवणुकीत हातात काठी घेऊन सहभागी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या व्हिडिओबाबत मुस्लिम समाजातील मान्यवरांनी सांगितले की, देसले हे गणेश मंडळाला सन्मान देत मिरवणुकीत पुढे घेऊन जाण्यासाठी हातात काठी घेऊन सहभागी झाले होते. मात्र, काही बाहेरील व्यक्तींनी या घटनेचा वेगळ्या पद्धतीने अर्थ लावत व्हिडिओ प्रसारित केल्याचे त्यांनी म्हटले.
पोलीस निरीक्षक पवन देसले सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करीत असून, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कायद्याच्या चौकटीत आणि योग्य पद्धतीने पोलीस प्रशासनाचे कामकाज सुरू असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले. तसेच, कोणत्याही घटनेचा व्हिडिओ किंवा माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यापूर्वी प्रत्यक्ष परिस्थितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन चोपडा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले.






