पाचोरा, 9 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा निश्चित झाला असून ते मंगळवारी पाचोऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या दौऱ्यात विविध कामांचे उद्घाटन व भुमिपूजन होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा अनेक दिवसांपासून चर्चेत –
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 27 जून रोजी ‘शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त जळगावात आले होते. या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या होत्या. दरम्यान, जळगाव जिल्ह्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पार पडल्यानतंर जिल्ह्यात पहिल्यांदाच पाचोरा तालुक्यात हा उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांच्या दौऱ्याच्या तारखेत आतापर्यंत तीनवेळा बदल करण्यात आला.
तालुकास्तरावर पहिल्यांदाच उपक्रम –
सरकारतर्फे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविला जात असून, त्याला मिळणारा प्रतिसाद व शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारा लाभ विचारात घेऊन पहिल्यांदाच तालुकास्तरावरही हा उपक्रम घेण्यात येत आहे. पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांसाठीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम मंगळवारी पाचोरा येथील एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. तालुकास्तरीय या उपक्रमाचा पहिलाच प्रयोग असल्याने कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सुमारे २५ हजार लाभार्थी उपस्थित राहणार असुन औद्योगिक वसाहत, ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, ५ कोटी रुपयांचे ऑक्सिजन पार्क (जॉगिंग ट्रॅक) भुमिपुजन, गिरड रोडवरील काकनबर्डी येथील परिसर सुशोभीकरणाचे भुमिपुजन, क्रीडा संकुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
असा असेल दौरा –
- मंगळवार, दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता शासकिय विमानाने
मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोरा, जि.जळगावकडे प्रयाण. - दुपारी 12.15 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण.
- दुपारी 12.30 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा) दुपारी 2.30 वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे प्रयाण.
- दुपारी 2.50 वा. नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव, जि.जळगाव व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भुमीपुजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि.जळगाव),
- दुपारी 3.30 वा. मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण.
- दुपारी 3.45 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण.
- दुपारी 4.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे रवाना.