जळगाव, 1 डिसेंबर : राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढली आहे. देशातील अनेक राज्यात थंडीच्या लाटेची सुरूवात झाली आहे. थंडी वाढल्याने जागोजागी रात्री शेकोट्या पहायला मिळत आहेत. तसेच थंडीपासून बचाव करणारे कपडे घातल्याशिवाय कुणीच बाहेर निघताना दिसत नाहीये. दरम्यान, राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद ही शनिवारी नाशिकच्या उत्तर भागामध्ये 8.9 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे.
राज्यात पारा घसरला –
हिवाळ्याची सुरुवात झाल्यानंतर आलेल्या थंडीच्या पहिल्या लाटेने पुण्यासह मध्य व उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील नागरिकांना सध्या हुडहुडी भरली आहे. पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी, दुपारी गारा वारा आणि संध्याकाळी पुन्हा गारठा असेच वातावरण अनुभवायला मिळते आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात कडाक्याचा थंडीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जळगावात थंडी वाढली –
नेहमीप्रमाणे यावर्षीही थंडी काहीशी उशिराने अनुभवास आली. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडी वाढायला सुरूवात झाली. तर आता डिसेंबर महिन्याला सुरूवात झाली असताना ह्या महिन्यात कडक थंडी राहणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत. तसेच पुढील तीन महिने थंडीचे असल्याचा अंदाज देखील वर्तविला जात आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून थंडी वाढली असून पुढील तीन दिवसांचे तापमान खालीलप्रमाणे असणार आहे.
1 डिसेंबर – कमाल तापमान – 12 अंश
2 डिसेंबर – कमाल तापमान – 13 अंश
3 डिसेंबर – कमाल तापमान – 14 अंश
वाढती थंडी रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर –
सध्या रब्बी हंगामासाठी पेरणी सुरू आहे. राज्यातील वाढती थंडी ही रब्बी पिकांच्या पेरणीत गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडी वाढल्याने रब्बीच्या पिकांसाठी ही थंडी फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये गहू आणि हरभरा या पीकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. डिसेंबर महिन्यात जेवढी जास्त थंडी वाढणार तेवढी ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र,वाढती थंडीचा फळभाज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.