मुंबई : धुळे शहर मतदारसंघातील सुशीनाला परिसरातील जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून त्याठिकाणी अनधिकृत मदरसे आहेत. त्याठिकाणी कोट्यवधींचे नुकसान होत आहे. असे सांगत हे अतिक्रमण सरकार किती दिवसात काढणार, असा सवाल आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी सरकारला केला. तसेच तो सुशिनाला आणि ती जागा ही सरकारी जागा आहे, जेलची जागा आहे का, याबाबतचा खुलासा करावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी काल विधानसभेत बोलताना आमदार अनुप भैय्या अग्रवाल म्हणाले की, धुळे मतदारसंघातील 113 सर्व्हे क्रमांक, सीटीएस नंबर 4795, एकूण क्षेत्र 6.14 हेक्टर या जागेवर 2023 पासून मी पाठपुरावा करत आहे, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. उताऱ्यावर ही जागा जेल असं त्याठिकाणी नमूद आहे. परंतु उत्तरात असं म्हटलंय की, जिल्हाधिकारी योग्य ती कार्यवाही करतील. परंतु 2023 पासून मुख्यमंत्री साहेबांनी त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, त्याठिकाणी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याठिकाणी अनधिकृत मदरसे आहेत. त्याठिकाणी लहान मुलांची शाळा आहे. आणि असं सांगण्यात आलं आहे की, ही जागा पूररेषेखाली येते.
जो सूशीनाला आहे, ज्याच्या पूररेषेखाली ही जागा येते तो नाला आता त्याठिकाणी गटार झालेली आहे. इतकं त्याठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. याबाबतचे सर्व फोटो माझ्याकडे आहेत. त्या अतिक्रमणामुळे त्याठिकाणी पाणी साचत आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी जात आहे. कोट्यवधींचं त्याठिकाणी नुकसान होत आहे. हे अतिक्रमण त्याठिकाणी किती दिवसात काढणार आहात, असा सवाल आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी सरकारला केला. तसेच तो सुशिनाला आणि ती जागा ही सरकारी जागा आहे, जेलची जागा आहे का, याबाबतचा खुलासा करावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा – अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 : रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत केल्या ‘या’ तीन महत्वाच्या मागण्या