सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 8 मे : पारोळा तालुक्यातील भोकर बारी येथे बांधावरील गवत जाळण्यासाठी आग लावली असता ती वाऱ्यामुळे सर्वत्र फैलून आजू बाजूच्या शेतात पसरली. या आगीत शेतातील चारा जळून खाक झाला.
काय आहे संपुर्ण बातमी? –
सध्या खरीप हंगाम एक महिन्यावर आल्याने शेतकऱ्यांची मशागत पूर्व कामांची लगबग सुरू आहे. शेतकरी शेतातील काडी कचरा, गवत व झाड झुडपे जाळून शेत तयार करीत आहेत. दरम्यान, पारोळा तालुक्यातील भोकर बारी येथील युसूफ बागवान हे आपल्या शेताच्या बांधावरील अनावश्यक गवत जाळत असताना वारा सुरू झाला. त्यामूळे बांधावरील गवताला लागलेली आग आजूबाजूला पसरली.
दरम्यान, या आगीत शेजारील देविदास बडगुजर, दीपक राजपूत, सुधाकर पाटील यांच्या शेतातील मोठ्या प्रमाणात चारा जळून खाक झाला. यावेळी मदतीसाठी पारोळा येथील माजी नगरसेवक राजेंद्र पाटील, संजय बन्सीलाल पाटील, गोकुळ ठाकरे, गुलाब महाजन,
भानुदास राजपूत, अरुण खाटीक यांनी घटनास्थळी धाव घेवून मदत केली. तात्काळ अग्निशामक बंब चालक मनोज पाटील व कर्मचारी यांना बोलावून आग आटोक्यात आणली. तरी किमान एक लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान शेतकऱ्यांनी गवत अथवा झाडाझुडपांनी आग लावताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून पारोळा तालुक्यातील शेतकरी तसेच मजूरांना करण्यात आले आहे.
हेही वाचा : Breaking : रामदेववाडीमध्ये भीषण अपघात प्रकरणी मोठी अपडेट, मृतांची संख्या पोहचली चारवर, नेमकं काय घडलं?