ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 5 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेकडून पाचोरा तालुक्यातील बांबरूड-करूंगी गटाचे माजी जि.प. सदस्य पदमसिंग पाटील यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेच्यावतीने पाचोऱ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विभागीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा 4 ऑक्टोबर रोजी दुपारी आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जि.प. सदस्य पदमसिंग पाटील यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बांबरूड-करूंगी गटातील जिल्हा परिषदेचे सदस्य पदमसिंग पाटील यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय असून, 2017 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. ते विविध समाजघटकांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगीही वेळोवेळी सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपत असतात. आपल्या कार्यकाळात त्यांनी गटातील विविध विकासकामांना गती दिली तसेच समाजहिताचे उपक्रम राबवले. त्यांच्या या कार्याची दखल म्हणूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वासराव आरोटे, उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, वाशिम जिल्हाध्यक्ष दिलीप सोमाने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, प्रविण ब्राम्हणे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






