गोंदिया, 13 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा सिद्दिकींच्या हत्येवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही दुर्दैवी आणि अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना असून बाबा सिद्दिकी यांच्याशी माझी स्वतःची निकटची मैत्री होती. तसेच अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले. त्यामुळे, अशा प्रकारच्या घटनेने आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आता या घटनेतील दोन आरोपी पकडलेले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
शरद पवार यांना प्रत्युत्तर –
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणातील काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगल्स लक्षात येत असल्यामुळे त्या संदर्भात आता लगेच बोलणे योग्य नाही. आज आरोपींची कस्टडी झाल्यानंतर पोलीस या संदर्भात माहिती देतील. दरम्यान, त्यांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर फक्त महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे. महाराष्ट्राचा विकास आणि सुरक्षा पाहायची आहे. त्यामुळे ते खुर्चीकडे पाहत आहेत, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.
लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली हत्येची जबाबदारी –
झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. हिंदी भाषेत मजकूर टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केली आहे, असे बाबा सिद्दिकी यांचे नाव घेऊन सांगितले आहे. दरम्यान, दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीत पोस्टमध्ये केला आहे.
हेही पाहा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कूपर हॉस्पिटलमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट