मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 20 मार्च : मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत चोपडा तालुक्यातील एमआयडीसीसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे सुमारे 117 एकर जागेत एमआयडीसीची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान, या एमआयडीसीसाठी 14 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.
नेमकी बातमी काय? –
चोपडा येथील औद्योगिक वसाहतीस परवानगी मिळावी आणि औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी 14 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुर करण्याची लेखी स्वरूपातील मागणी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, एमआयडीसीबाबतच्या 14 कोटी रूपयांच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरीचे आदेश देऊन चहार्डी येथे जलदगतीने औद्योगिक क्षेत्र विकसित करावे, असे आदेश मंत्री उदय सामंत यांनी दिल्याची माहिती आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.
मंत्री उदय सामंत यांचे आदेश नेमके काय? –
पहिल्या टप्प्यात 50 एकरावर औद्योगिक क्षेत्र आकारास येईल, यानंतर टप्प्याटप्प्याने यात वाढ होईल. सादर केलेल्या आराखड्यानुसार सीमांकन करण्यात आले असून या क्षेत्राचा दरनिश्चितीचा प्रस्ताव ऑक्टोबर 2024 रोजी मुख्यालयात सादर केलेला आहे. या प्रस्तावानुसार जांबुटके, ता. दिंडोरी या एमआयडीसीप्रमाणेच आदिवासी क्लस्टरचे नियोजन करुन 90 दिवसांत दर निश्चिती करावी, असे आदेश मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.
यांची होती उपस्थिती –
या बैठकीला बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले माजी आ. राजन साळवी व उद्योग विभागाचे सह मुख्यकार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य अभियंता मुंबई प्रकाश चव्हाण, मुख्य अभियंता संभाजीनगर राजेंद्र गावडे, राजेंद्र गांधीले, व्यवस्थापक भुसंपादन रागिणी ढसाळ व जळगाव प्रादेशिक अधिकारी एस.एस. घाटे, उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे हे उपस्थित होते
हेही वाचा : 2029 मध्ये भाजपकडून पंतप्रधान कोण असणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट नावच सांगितलं