चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
रामदेववाडी, 23 मे : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर रामदेववाडी अपघात प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. रामदेववाडी अपघातात आरोपींना वाचवले जात असल्याचा आरोप केला जात होता. याप्रकरणी जळगाव पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून मुंबईतून 2 जणांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव पोलिस अॅक्शन मोडवर –
पुण्यातील अपघातासंदर्भात शासनाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि रामदेववाडी अपघातात पोलिसांकडून सुरू असलेला तपास यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले. पुण्यासाठी वेगळा आणि रामदेववाडीसाठी वेगळा न्याय का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ लागला होता. दरम्यान, याप्रकरणात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ए. सी. मनोरे यांच्याकडून सुरू असलेला तपास काढून घेतला.
डीवायएसपी संदीप गावीत यांच्याकडे रामदेववाडी अपघात प्रकरणाचा तपास सोपविल्यानंतर जळगाव पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. या अपघात प्रकरणातील संशयित आरोपींवर मुंबई येथे रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांना आता मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
जळगावच्या एसपींनी दिली महत्वाची माहिती –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आरोपींना सोबत घेवून पथक आज सायंकाळी सहा वाजता जळगाव शहरात पोहोचणार असून दोघी आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. मृत व्यक्तिंच्या कुटुंबीयांच्यावतीने आरोपी नशेत असल्याचा आरोप करण्यात आल्याने दोघा आरोपींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी दिली आहे.
बिल्डर आणि राजकारण्याचा मुलाचा समावेश –
रामदेववाडी अपघात प्रकरणात 17 व्या दिवशी उशिराने जळगाव पोलिसांनी बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार याला ताब्यात घेतले आहे. दोघांना घेऊन पोलीस जळगावच्या दिशेने रवाना झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
रामदेववाडी अपघात प्रकरण –
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे आशा वर्कर असलेल्या वत्सला सरदार चव्हाण या काम संपवून मुलगा सोहम (वय 8), सोमेश (वय 2) सर्व ह. मु. रामदेववाडी, ता. जळगाव) व भाचा लक्ष्मण नाईक (वय 17), रा. मालखेडा, ता. जामनेर) हे 7 मे रोजी दुचाकीने शिरसोली येथे येत होते. रामदेववाडी गावाच्या पुढे भरधाव कारने (क्र. एम.एच. 19 सी.व्ही. 6767) चव्हाण यांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत वत्सला (27) व मुलगा सोमेश चव्हाण (2) हे दोघे जागीच ठार झाले होते. सोहम चव्हाण (8) आणि गंभीर जखमी लक्ष्मण राठोड (17) यांचा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
हेही वाचा : सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी