ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 10 एप्रिल : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या पार्श्वभूमीवर जळगांव लोकसभा मतदार संघांतर्गत पाचोरा विधानसभा मतदार संघात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांचे अध्यक्षतेखाली आज पाचोरा येथील गो. से. हायस्कूलमध्ये मतदार जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत विशेष नियोजन –
या कार्यक्रमात सन 2019 मध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये 50 % पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष देऊन मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत विशेष नियोजन करण्यात आले. तसेच 85 वर्षांहून अधिक वयाचे मतदार, स्तनदा, गरोदर, दिव्यांग, तृतीयपंथी व स्थलांतरित मतदार यांवर विशेष भर देऊन या सर्वांचे मतदान 100 % करुन घेणेबाबत मार्गदर्शन व विशेष सूचना सभेत देण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती –
यावेळी पाचोरा पं. स. गट विकास अधिकारी स्नेहल शेलार, सदर कार्यक्रमास श्रीमती, स्नेहल शेलार, गट विकास अधिकारी, पं. स. पाचोरा, ना. त. उ.वि.अ. कार्यालयाचे सुभाष कुंभार, सहाय्यक गट विकास अधिकारी मारुती भालेराव, पाचोरा CDPO जिजाबाई राठोड, गट शिक्षणाधिकारी समाधान पाटील, शापोआ, अधिक्षक सरोज गायकवाड, तसेच 18- पाचोरा विधानसभा मतदार संघातील सर्व केंद्र प्रमुख, पाचोरा शहरातील शाळांचे मुख्याध्यापक, BLO शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.