जळगाव, 4 ऑक्टोबर: दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून त्यांना मदत करावी असे निर्देश देत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिक आणि शेतकरी यांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणी तत्परतेने सोडवाव्यात नागरिकांची व शेतकऱ्यांची अनावश्यक अडवणूक करू नये असे निर्देश संबंधितांना दिलेत.
दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांचा आढावा –
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आज आयोजित बैठकीत महसूल मंत्री श्री बावनकुळे बोलत होते. यावेळी केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? –
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण तसेच कृषीपंपांना वीजजोडणी देताना, बँका आणि महावितरणे कोणतीही टाळाटाळ करू नये. शेतकऱ्यांच्या अर्जांकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वारंवार कागदपत्रांची मागणी करून नागरिकांना वेठीस धरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी करा –
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांच्या घरी जाऊन तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबवून एकही पात्र शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह वीज केबल चोरीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आणि महावितरणने समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्वाचे आदेश –
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मुख्यालयी अनुपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि गतिमान पद्धतीने काम करावे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने तत्पर सेवा देण्याचे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
बैठकीत वीजतार चोरी संदर्भात समस्येचा मुद्दा उपस्थित –
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी, जिल्ह्यात होणाऱ्या वीजतार चोरी संदर्भात समस्या मांडली. पालकमंत्री श्री पाटील यांनी यावेळी जिल्ह्यात, विविध योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगती संदर्भात माहिती सांगून ते म्हणाले जिल्ह्यात सध्या स्थितीला योग्य समन्वयाने काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले. तसेच विज चोरी संदर्भात पोलिसांमार्फत झालेल्या कारवाईची माहिती दिली.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळ परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा होईल या दृष्टीने महावितरण विभागाने दक्षता घ्यावी, चारा उपलब्ध होईल अशा प्रकारची पिके शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घ्यावीत. वनविभागाने सुद्धा या संदर्भात नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.
बैठकीत आमदार नंदकिशोर महाजन, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मतदार संघातील आवश्यक उपयोजना संदर्भात सूचना मांडल्या. बैठकीच्या सुरुवातीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व नागरिकांची विविध समस्यांची निवेदने स्वीकारली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रास्ताविकात पर्जन्यमान, पीक स्थिती, जलसाठा, पाणीटंचाई, चाऱ्याची उपलब्धता बाबत सद्यस्थितीची माहिती दिली तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे सादरीकरण केले. बैठकीला, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, पोलीस, आरोग्य यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा: पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक






