मुंबई, 30 जून : भारतीय क्रिकेटने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात द. आफ्रिकेला हरवत तब्बल 17 वर्षांनतर टी-20 विश्वचषकावर नाव कोरलंय. बार्बाडोस येथे रंगलेल्या या अंतिम सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. दरम्यान, या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे सर्वत्र कौतुक केले जात असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट संघाचे अनोख्या शब्दात कौतुक केलंय.
सचिन तेंडुलकरने केले कौतुक –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवरून भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केले. तेंडुलकरने त्या ट्विटमध्ये म्हटलंय की, टीम इंडियाच्या जर्सीवर समाविष्ट होणारा असा प्रत्येक स्टार भारतातील उद्याच्या क्रिकेटपटूंच्या पिढीला त्यांच्या डोळ्यांमधली ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी बळ देणारा ठरणार आहे. भारतानं विश्वविजयाचा चौथा स्टार या विजयानं मिळवला आहे. टी २० वर्ल्डकपमधलाभारतासाठीचा दुसरा स्टार, असे म्हणत सचिन तेंडुलकरने संपूर्ण टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.
राहुल द्रविडचा केला उल्लेख –
सचिन तेंडुलकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कोच राहुल द्रविड यांचा देखील उल्लेख केलाय. त्यंनी म्हटलंय की, वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियासाठी जणूकाही एक पूर्ण चक्रच पूर्ण झाले. 2007 साली तिथे झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील आपल्या पराभवापासून ते काल तिथे टीम इंडियानं साजऱ्या केलेल्या टी २० विश्वचषक 2024 मधील विजयापर्यंत! माझा मित्र राहुल द्रविडसाठी मी खूप खूश आहे. तू 2011 चा वर्ल्डकप मिस केलास. पण टी 20 वर्ल्डकपमधील विजयात तुझं योगदान अमूल्य असे आहे. मी त्याच्यासाठी खूप खूश असल्याचे तेंडुलकरने नमूद केलंय.
रोहित, विराट आणि बुमराह यांचे कौतुक –
सचिनने भारताच्या रोहित, विराट आणि बुमराह या दिग्गज त्रिकुटाचेही कौतुक केले आहे. मी रोहित शर्माविषयी काय बोलू? जबरदस्त कॅप्टन्सी! 2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकपमधील पराभव मागे सारून टी 20 वर्ल्डकपसाठी आपल्या खेळाडूंना सतत प्रोत्साहन देत राहणे हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांची कामगिरी मालिकावीर आणि सामनावीराच्या पुरस्काराला साजेशी अशीच होती आणि जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा त्यांनी सर्वोत्तम खेळ केला”, असेही सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे.
महेंद्रसिंग धोनीने केले कौतुक –
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने देखील भारतीय संघाचे कौतुक केले. त्याने म्हटलंय की, माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि तुम्ही शांत राहून आत्मविश्वास ठेवून जे काही केले, त्यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन. सर्व भारतीयांकडून वर्ल्ड कप घरी परत आणल्याबद्दल सर्वांचा आभारी असून वाढदिवसाच्या अनमोल गिफ्टसाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद!
हेही वाचा : धक्कादायक! ठाण्यात पोलीस भरतीदरम्यान अमळनेर येथील तरूणाचा दुर्दैवी मृत्यू