जळगाव, 7 ऑक्टोबर: जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया समुपदेशनाद्वारे पारदर्शक पद्धतीने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
या प्रक्रियेत मराठी माध्यमाचे १४ व उर्दू माध्यमाचे १२, अशा एकूण २६ अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे समायोजन करण्यात आले.
तसेच पवित्र पोर्टल टप्पा-१ मधील कन्फर्मेशन राऊंडमध्ये प्राप्त झालेल्या यादीनुसार, मराठी माध्यमाचे ५२ व उर्दू माध्यमाचे २०, अशा एकूण ७२ शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली.
ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांनुसार पारदर्शक, निष्पक्ष आणि समुपदेशनाच्या माध्यमातून राबविण्यात आली. प्रक्रियेदरम्यान शिक्षकांना उपलब्ध रिक्त पदांची माहिती देऊन त्यांच्या पसंतीनुसार व नियमानुसार पदस्थापना व समायोजनाची कार्यवाही करण्यात आली.
या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यकतेनुसार शिक्षक उपलब्ध होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या समन्वयपूर्ण कामगिरीबद्दल प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
हेही वाचा: Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ






