चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 7 मे : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुती तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात दौरे व जाहीर सभांचे आयोजन करण्यात येत असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज जळगावात येत आहेत.
उद्धव ठाकरे आज जळगावात –
महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार करण पवार यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज जळगावात येत आहेत. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर त्यांच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांची सभा आज संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे.
कोणावर निशाणा साधणार –
यंदाच्या लोकसभा निवडणूकीत उन्मेश पाटील यांचे तिकीट कापल्याने त्यांनी करण पवार यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यांनतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगावात येत आहेत. दरम्यान, ते महायुतीतील कोणा-कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस भुसावळात –
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ येथे आज संध्याकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा पार पडणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे ह्या असून त्यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस भुसावळात येत आहेत.
हेही वाचा : महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल! कोणत्या मतदारसंघातून कोण लढतंय? वाचा, एका क्लिकवर