डोंबिवली, 24 मे : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. दरम्यान, या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असताना शोध कार्यात अजून तीन मृतदेह सापडले आहेत. दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून शोधकार्य सुरु आहे.
मृतांची संख्या 11 वर –
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून शोधकार्य सुरु करण्यात आले. यामध्ये काल 8 जण मृतावस्थेत आढळून आले होते. तर आज दुसऱ्या दिवशी शोधकार्यादरम्यान सकाळी उद्ध्वस्त अवशेषांमध्ये आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. यापैकी एक मृतदेह केजी केमिकल्स कंपनीच्या आवारात आढळला असून अग्निशमन दलाने हे मृतदेह एनडीआरएफच्या ताब्यात दिले आहे. ते आता रुग्णालयात पाठवले जातील. दरम्यान, डोंबिवली एमआयडीसी आग प्रकरण आता मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे.
मृतांच्या कुटुंबाना 5 लाख रुपयांची मदत –
अमूदान कंपनीतील बॉयलर स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती मेहता आणि मलय मेहताविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबाना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आगीच्या घटनेवर शोक व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
डोंबिवली एमआयडीसी आग प्रकरण –
डोंबिवलीतील एमआयडीसीत अमुदान कंपनीमध्ये काल गुरुवारी दुपारी बॉयलरचा स्फोट होऊन भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाचे हादरे दोन ते किलोमीटरच्या परिसरात बसल्याने या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. तसेच बॉयलरचे तुकडे दीड किलोमीटर लांबच्या अंतरावर फेकले केले होते. हे तुकडे चारचाकी वाहनांवर पडून कोसळून त्यांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली. अग्निशमन दलाने गुरुवारी रात्रीच एमआयडीसीमधील आगीवर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून सर्च ऑपरेशन सुरु झाले होते.
हेही वाचा : रामदेववाडी अपघात प्रकरणात मोठी अपडेट, मुंबईतून 2 जणांना अटक, काय आहे संपूर्ण बातमी?