मुंबई, 5 मार्च: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी प्रश्नोत्तरांच्या तासात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत मुद्दा उपस्थित केला. यावेळी पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींसंदर्भात मांडलेल्या मुद्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी महत्वाची माहिती दिली.
राज्यात पीक पेरा नोंदणी प्रकियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करणार असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले. राज्यात पीक पेरा नोंदणी प्रकियेत येणाऱ्या अडचणी शासन कधी सोडविणार असा प्रश्न विधानसभा सदस्य अनिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, इंटरनेटचे नेटवर्क नसले, तरी शेतकरी पिकांचा फोटो काढून ते पीक पेरा नोंदणी करू शकतात. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर नाव नोंदणी ही प्रक्रिया शेतावर जाऊन करण्याची गरज नाही.
पीक पाहणी नोंदणी करण्याकरिता प्रत्येक गावात सहाय्यकाची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यस्तरावर शेतकऱ्याकरिता मदत कक्ष आहे त्यामार्फतही तांत्रिक अडचणी दूर केल्या जातात. तरीही यामध्ये अजून काही त्रुटी असल्यास दूर केल्या जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.






