चोपडा, 7 ऑक्टोबर: नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ, जळगाव (महाराष्ट्र शासन अंगीकृत) अंतर्गत प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र, चोपडा कार्यालयांतर्गत आज जीवामृत, वर्मी कंपोस्ट, दशपर्णी अर्क तसेच गांडुळ खत निर्मिती व वापर याबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी व महिला बचत गटातील महिलांना नैसर्गिक शेतीतील विविध निविष्ठांची निर्मिती, त्यांचा योग्य वापर तसेच शेती उत्पादनात होणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे व त्यांची कृषी विभागाची टीम तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या मार्गदर्शनातून नैसर्गिक शेतीचे महत्त्व, रासायनिक खतांचा कमी वापर करून जमिनीची सुपीकता टिकविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान जीवामृत तयार करण्याची पद्धत, त्यासाठी लागणारे साहित्य, प्रमाण व पिकांमध्ये त्याचा वापर याबाबत माहिती देण्यात आली. तसेच वर्मी कंपोस्ट व गांडुळ खत निर्मितीची प्रक्रिया, गांडुळ संगोपन, खताची गुणवत्ता आणि त्याचा शेतीमध्ये वापर याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच दशपर्णी अर्काची निर्मिती व पिकांवरील विविध किडींच्या व्यवस्थापनासाठी त्याचा नैसर्गिक पद्धतीने उपयोग कसा करता येतो, याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसामग्रीचा उपयोग करून कमी खर्चात शेतीसाठी आवश्यक निविष्ठा तयार करता येतात, याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या टीमने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत नैसर्गिक शेती करताना घ्यावयाची काळजी, पिकांची निगा, मातीचे आरोग्य आणि शेतीतील खर्च कमी करण्याच्या विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. मा. तहसीलदार साहेबांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत नैसर्गिक शेतीचा अधिकाधिक अवलंब करून शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. नैसर्गिक शेतीचा स्वीकार – निरोगी माती, निरोगी पीक आणि समृद्ध शेतकरी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.
हेही वाचा: कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ






