यावल (जळगाव), 3 मे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या दौऱ्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात झाल्याची माहिती हाती आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी चोपडा, भुसावळ आणि मुक्ताईनगर या तीन ठिकाणी शरद पवार यांच्या सभा पार पडत आहेत. शरद पवार यांचे आज सकाळी जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर त्यांची चोपडा येथे सभा पार पडली. यानंतर त्यांचा वाहनांचा ताफा भुसावळकडे निघाला असताना, त्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला आहे.
ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात –
शरद पवार यांचा ताफा चोपड्यावरून भुसावळकडे जाताना यावल तालुक्यातील किनगावजवळ पोहचला. त्यावेळी एक वाहन दुसऱ्या वाहनावर आदळल्याने हा अपघात घडून आला. दरम्यान, या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नसून वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : महायुतीचे जागावाटप फायनल! कोणत्या मतदारसंघातून कोण लढतंय? वाचा, एका क्लिकवर