विशेष प्रतिनधी
पाचोरा, 12 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यात येत आहेत. पाचोरा शहरातील एम.एम. कॉलेजच्या मैदानावर हा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. दरम्यान, पाचोरा शहरातील या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जळगाव-पाचोरा रस्त्यावरील नांद्रा ते हडसन दरम्यान असलेल्या ‘नर्मदा अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे उद्घाटन होणार आहे.
आज दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी या नर्मदा अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच यांच्या जिल्ह्यातील अनेक राजकीय नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नर्मदा अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट ही कंपनी नेमकी काय आहे, याठिकाणी नेमकं कशाचं उत्पादन केलं जाणार आहे, याबाबत जाणून घेऊयात.
काय आहे ही कंपनी? –
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज या नर्मदा अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीचे उद्घाटन होत आहे. या कंपनीच्या रुपाने जिल्ह्यातील पहिला 300 मेट्रिक टन प्रति महिना क्षमतेचा पी. पी. वोव्हन बॅगचा तथा सॅक उत्पादन करणारा हा उद्योग प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पात जगप्रसिद्ध लोहिया कार्पो. कंपनीची अद्ययावत मशिनरी कार्यान्वित केली असून निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल देशभरातील गुणवत्ता प्राप्त कंपन्यांकडून प्राप्त होणार आहे.
पीपी-बॅगची निर्मिती –
तसेच या नर्मदा अॅग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून पीपी – बॅगची निर्मिती तयार केली जाईल. त्या बॅगचा उपयोग रासायनिक खते पॅकिंगसाठी, बि-बियाणे, शेतीतील अन्नधान्य पॅक करण्यासाठी तसेच साखर पॅकिंगसाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स पॅकिंग करण्यासाठी वापरली जाईल. या कंपनीत एकाच छताखाली टेप एक्सट्रूझन लाइन, लूम्स, लैमिनेशन स्टीचिंग, प्रिटिंग इ.ची सुविधा उपलब्ध केली आहे. सध्या या कंपनीमध्ये 70 कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला देण्यात आली.
तरूणांना रोजगाराच्या संधी –
नर्मदा अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर सुनिता किशोर पाटील आहेत. तर संगीता राजेंद्र पाटील व स्नेहल विजय पाटील या डायरेक्टर आहेत. दरम्यान, या नवीन उद्योगाच्या माध्यमातून पाचोरा भडगाव तालुक्यातील तरूण-तरूणींना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.