जळगाव, 1 जुलै: जळगाव जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या भुकरमापकाला प्रलंबित काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज 1 जुलै रोजी रंगेहात पकडले. जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) असे या भुकरमापकाचे नाव असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या जळगाव शहरातील वडिलोपार्जित घराच्या मालकीच्या नोंदीत फेरफार झाल्याने त्यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयात अपील दाखल केले होते. या अपीलावर निर्णय होऊन संबंधित फेरफार रद्द करण्यात आला होता. तसेच तक्रारदार यांच्या वडिलांचे नाव पुन्हा ७/१२ उताऱ्यावर नोंदविण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार, आवश्यक दुरुस्ती करून नोंद अद्ययावत करण्यासाठी तक्रारदारांनी २५ डिसेंबर २०२५ आणि ५ जून २०२६ रोजी अर्ज सादर केले होते. मात्र, आदेश असूनही संबंधित काम प्रलंबितच राहिले.

दरम्यान, १८ जून २०२६ रोजी तक्रारदार कामाच्या चौकशीसाठी कार्यालयात गेले असता भुकरमापक जितेंद्र पाटील यांनी “साहेबांशी बोलून तुमचे काम करून देतो,” असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांसाठी १० हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांच्या इच्छेनुसार स्वतःसाठीही रक्कम देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रारदारांनी २५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
अन् एसीबीने पकडले रंगेहात –
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, जितेंद्र पाटील यांनी संबंधित काम करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली १० हजार रुपये आणि स्वतःसाठी ५ हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही रक्कम स्वीकारण्यास त्यांनी पंचांसमक्षही संमती दर्शविली.
त्यानंतर आज आयोजित करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान तक्रारदारांकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जितेंद्र पाटील यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई –
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, मपोहेकॉ संगिता पाटील, पोकॉ. राकेश दुसाने, पोकॉ. प्रदीप पोळ, पोकॉ. मनोज पाटील यांनी केली. दरम्यान, कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे.
हेही वाचा: चोपडा शहर पोलिसांची तत्परता; अवघ्या दोन तासांत हरवलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा सुखरूप शोध






