जळगाव, 22 जून: जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी ५८२ मते मिळवून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. जळगावच्या अल्पबचत भवनात कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.
कोणाला किती मते मिळाली? –
एकूण ६११ वैध मतांपैकी उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मते खालीलप्रमाणे आहेत:
- नंदकिशोर भागवत महाजन (महायुती): ५८२ मते
- तायडे शरद शामराव (महाविकास आघाडी): १७ मते
- अनिल छबिलदास चौधरी: ११ मते
- रेश्मा कुंदन काळे: १ मत
मतमोजणीची सविस्तर आकडेवारी –
निवडणूक प्रक्रियेत एकूण ६१६ मते मोजण्यात आली. त्यापैकी ५ मते अवैध ठरली, तर ६११ मते वैध ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी रोहन घुगे यांनी मतमोजणीचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
- टेबल क्र. १: नंदकिशोर महाजन – २०७ | शरद तायडे – ३
- टेबल क्र. २: नंदकिशोर महाजन – १९१ | शरद तायडे – ४
- टेबल क्र. ३: नंदकिशोर महाजन – १८४ | शरद तायडे – १०
- एकूण वैध मते: ६११
- एकूण अवैध मते: ५
जळगावात महायुतीचा एकतर्फी विजय –
महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना 582 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना अवघी १७ मते मिळाली असून नंदकिशोर महाजन यांनी सुरुवातीपासूनच तिन्ही टेबलवर मोठी आघाडी घेतली होती. महाजन यांच्या या विजयानंतर जळगावात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जळगावात पुन्हा एकदा महायुतीचे पारडे जड झाले आहे.






