चंडीगढ – हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहेत. यामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माजी कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विनेश फोगाट हिचा विजय झाला आहे. हरयाणाचा जुलाना विधानसभा मतदारसंघातून त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढल्या. यामध्ये त्यांचा विजय झाला आहे.
विनेश फोगाट यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार योगेश कुमार यांचा 6 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. याचठिकाणी आम आदमी पक्षाच्या वतीने आणखी एक कुस्तीपटू रिंगणात होत्या. आम आदमी पार्टीच्या वतीने विनेश फोगाट यांच्या विरोधात WWE च्या रेसलर कविता रानी (कविता दलाल) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यांना फक्त 1200 पेक्षा जास्त मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. दरम्यान, विनेश फोगाट यांना एकूण 65,080 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या योगेश कुमार यांना 59,065 मते मिळाली आहेत. यामध्ये विनेश फोगाट यांचा 6015 मतांनी विजय झाला आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर विनेश फोगाटची पहिली प्रतिक्रिया –
विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव करत 6015 मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. विनेश फोगाट म्हणाल्या की, मी काँग्रेस पक्षाचा विश्वास कायम ठेवीन. मतमोजणीत काँग्रेस पक्ष मागे पडत असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, थांबा. निकाल येऊ द्या. मी पण आधी मागे चालत होतो. निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. मी राजकारणात प्रवेश केला असेल तर मला सक्रिय राहावे लागेल. लोकांनी प्रेम दिले आहे. त्यांच्यासाठी काम करावे लागेल. मी शेतात जाऊन लोकांसाठी काम करेन. खेळासाठी शक्य तेवढे काम करेन. मात्र, मी एका क्षेत्रापुरते मर्यादित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.